पुणे शहर म्हणजे केवळ शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं ठिकाण नाही, तर इतिहासाच्या गाभ्यात डोकावण्याची संधी देणारं एक अनमोल रत्नही आहे – भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (BORI). प्राचीन भारतीय साहित्य, हस्तलिखिते, संशोधन आणि अभिजात संस्कृती यांचा अनमोल ठेवा जपणाऱ्या या संस्थेचा एक अभ्यासदौरा मला घडला आणि त्यानंतर या संस्थेबद्दलचं माझं दृष्टिकोनच बदलून गेला.
संस्थेचा गौरवशाली इतिहास
ही संस्था १९१७ साली प्राच्यविद्येचे महान संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्थापन करण्यात आली. संस्थेने भारतीय परंपरा, इतिहास आणि शास्त्र यांचं संरक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेचा संचालक आणि व्यवस्थापक निखिल गाडगीळ सर यांनी आम्हाला या संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली.
संस्थेच्या स्थापनेमध्ये अनेक अभ्यासक आणि विचारवंतांचा हातभार होता. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीपासून ते वेदविद्या आणि पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासापर्यंत, विविध संशोधन प्रकल्प येथे पार पडले आहेत.
भांडारकर इन्स्टिट्यूटचा ठेवा आणि संशोधन कार्य
BORI कडे भारतातील काही सर्वात मोठे आणि दुर्मिळ प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित संग्रह आहेत. संस्थेकडे १,६०,००० हून अधिक पुस्तके आणि २८,००० पेक्षा अधिक हस्तलिखिते आहेत. यामध्ये संस्कृत, प्राकृत, भारतीय प्रादेशिक भाषा आणि काही युरोपियन भाषांतील प्राचीन ग्रंथांचा समावेश आहे.
संस्थेची वैशिष्ट्ये:
✅ ग्रंथालयात साठवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा
✅ हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी विशेष रासायनिक प्रयोगशाळा
✅ अम्फिथिएटर, जिथे विविध अभ्यासविषयक व्याख्याने घेतली जातात
✅ जैन गार्डन, एक सुंदर आणि शांत परिसर
✅ पांडुरंग वामन काणे – साहित्य क्षेत्रातील भारतरत्न मिळवणारे एकमेव संशोधक
संस्थेमध्ये शिकण्यासारखं काय आहे?
संस्था केवळ प्राचीन ग्रंथसंग्रहासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे विविध अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवले जातात. काही प्रमुख अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत:
📖 वेदविद्या – भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी
📖 भारतीय दर्शनशास्त्र एक परिचय – भारतातील विविध तत्त्वज्ञान शाखांचा अभ्यास
📖 प्रवास महाभारत – महाभारताच्या विविध पैलूंची सखोल माहिती
📖 कालिदास आणि भाषा – संस्कृत काव्य आणि नाट्य परंपरेचा अभ्यास
📖 पुरातत्त्वशास्त्राची मूलभूत तत्त्वे – इतिहास आणि पुराणात रस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम
महाभारत प्रकाशन आणि निजामाची देणगी
महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या प्रकाशनासाठी संस्थेला हैदराबादच्या सातव्या निजाम मीर उस्मान अली खान यांनी मोठे अनुदान दिले होते. ११ वर्षांसाठी प्रतिवर्षी १००० रुपये आणि अतिथिगृहाच्या बांधकामासाठी ५०,००० रुपये असे मोठे सहकार्य त्यांनी केले होते.
BORI ने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यासाठी विष्णू सीताराम सुखठणकर यांची संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या संशोधनाच्या दर्जामुळे संपूर्ण जगभरातून BORI ला मान्यता मिळाली.
BORI भेटीतील वैयक्तिक अनुभव
रानडे इन्स्टिट्यूटच्या Culture Journalism अभ्यासदौऱ्यामुळे या संस्थेच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. संस्थेच्या जुन्या इमारतीत पाऊल टाकताच एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्यासारखं वाटलं. आम्ही वेगवेगळ्या विभागांना भेट दिली – हस्तलिखित विभाग, ग्रंथालय, संशोधन विभाग, आणि हे पाहताना वेळ कुठे गेला कळलंच नाही!
निखिल गाडगीळ सरांनी संस्थेची माहिती सांगताना हस्तलिखिते जतन करण्याच्या प्रक्रियेपासून, तिथे चालणाऱ्या संशोधन प्रकल्पांपर्यंत सर्व काही सांगितलं. त्यातली काही पुस्तकं आणि ग्रंथ चक्क हजारो वर्षांपूर्वीची होती, ज्यात भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा दडलेला होता.
BORI मध्ये जपलेला हा ठेवा म्हणजे केवळ ग्रंथसंग्रह नाही, तर आपल्या संस्कृतीचा आरसा आहे. प्राचीन भारतीय ज्ञान आणि इतिहास जतन करणाऱ्या या संस्थेला भेट दिल्याने एक वेगळाच आत्मीय अनुभव मिळाला.
Comments
Post a Comment