लिहिण्यास कारण की :
पुणे विद्यापीठात झालेल्या उत्कर्षाच्या कार्यक्रमाला मी पूर्णवेळ पुणे विद्यापीठाच्या मार्फत माध्यमांचा प्रतिनिधी कार्यक्रमांचे वार्तांकन करत होतो. त्यादरम्यान पुणे विद्यापीठाच्या संघाची थीम 'वारकरी संप्रदाय' यावर आधारित होती. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठाच्या पथ्यनाट्याचे नाव होते "होय आम्ही आमचं मूळ विसरलोय" त्यामध्ये संत साहित्यातील आशय काढून भाष्य केले होते आणि आजच्या घडीला संत साहित्य किती कालसुसंगत आहे यावर उत्तमरित्या भाष्य केले होते. मग मी विचार केला 'आपल्याला किती संत साहित्य माहिती आहे?' किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली आणि समर्थ रामदास स्वामीनी दासबोध लिहिली हे माहित आहे. संत साहित्यांची नावच आपल्याला माहित आहे त्या पलीकडे जाऊन कधी आपण त्याला वाचण्याचा प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न मनाला भेडसावत होता. मग खरंच वाटायला लागलं की आपण आपलं मूळ विसरत चाललोय. आपलं म्हणजे असं झालं आहे की घरात ज्ञानरूपी सोन्याची खान असताना, आपण फक्त ऊर भरून अभिमानच बाळगायचा "संत साहित्य डोक्यावर घेऊन नाचायची नाही, तर डोळ्यासमोर घेऊन वाचायची गरज आहे आपल्याला....!"
संत साहित्य आणि मराठी भाषा:
"मनुष्य हा भाषिक प्राणी आहे" जे हसकोविटस यांनी सांगितलेली व्याख्या आहे. भाषा ही संवाद करण्याचे माध्यम आहे.
मराठी भाषेमध्ये जेवढ मधाळ, लाघवी आणि रसाळ लिखाण संतानी केलं आहे. तेवढं नंतर कोणालाही लिहिता आलं नाही. महाराष्ट्राचा उल्लेख करताना संत ज्ञानेश्वर माऊली लिहतात
इये मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळू करी।।
देणे घेणे सुखचि वरी। होऊ देई या जनां ।।
ज्ञानोबा मराठी भाषेला नगरीची उपमा देतात. त्यापुढे माऊली मराठी भाषेबद्दल म्हणतात की या मराठी नगरी आत्मज्ञानाची रेलचेल होऊ द्या.
माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।१४।।ज्ञानेश्वरी अध्याय सहावा.
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कर्माची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही.
संत साहित्य आणि आपण :
महाराष्ट्रात ७०० वर्षापूर्वी वारी सुरू झाली याचे ऐतिहासिक संदर्फ मिळतात. त्यातील रोजच्या रोज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात एकदा ना एकदा घुमणारे हे काही सर्वसामान्य तोंडातील अभंग
"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"
"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी"
"नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती?"
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मनिलेये बहुमता"
"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ"
"कोणाही जीवाचा न घडो मत्सर"
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"
"असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास"
"नाही निर्मळ जीवन काय करील साबण?"
"आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा"
"खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, नाचती वैष्णव भाई रे"
सगळे वारकरी मिळून मिसळून आनंद साजरा करत आहेत ते पण त्यांना अजून कोणताच रंग,जाती, उच्चनीच असले भाव भेद करण्यासाठी चिकटले नाहीत म्हणजेच विनाभेदभाव. वारकरी संप्रदायामध्ये सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात. उच्चनीचतेच्या कंबरेत लाथ घालून वारकरी संप्रदायाने समग्र समाज एकत्र केला आहे.
या सर्व ओळी एकाच लेखकाच्या आहेत. ज्या लेखकाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे कागद इंद्रायणीत बुडवले. ज्या लेखकाने या ओळी साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहिल्या आणि आजही महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात कोणाच्या ना कोणाच्या तोंडी आपण ऐकत असतो. तेवढ्याच आजच्या समाजाला कालसुसंगत आणि अभिप्रेत संदेश आहेत. एवढी लोकप्रियता जगात फार कमीच लेखकांना मिळते. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे महाराष्ट्राचा माथा आहे.
वैश्विक शांती (पसायदान)
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
सर्वसमावेशक भावना संतांच्या लिखाणातून दिसते. त्यातून आपण तेच शिकले पाहिजे. जे समाज अभिप्रेत आहे, ज्यामुळे समाजाचा फायदा होईल. आपल्या सोबत दुसऱ्याचेही आयुष्य सत्कर्मी कसे लागेल. लिखाणाचा आशय आपल्यात रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भजनी मंडळ आणि मी :
गावात असंख्य भजन व्हायची त्या भजनांना मी कधी कधी जायचो, मग तिथे गेल्यानंतर काही येत नसल्यामुळे टाळ कुटणे हेच करता यायचं मला फक्त हळूहळू कळालं ते टाळ सुद्धा एका सुरात वाजवायचे असतात त्याला तीन तीन च्या सेटमध्ये एकमेकावर आदळायचं असतं. स्वरांमध्ये आपण शाळेत असताना बारा स्वर शिकलेलो असतो त्यातील भजनात अभंगाच्या सुरुवातीला "आ"हे स्वर वापरून आलाप दिला जातो हे मला अलीकडेच कळालं. माझ्या मित्राने मला हरिपाठाचे पुस्तक दिलं होतं ते छोटसं होतं पण त्यातील शब्द मात्र प्रभावी होते त्यात माऊलींचे अभंग होते जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग होते त्या शब्दांना बघून तुकाराम महाराजांचा मी ऐकलेला अभंग आठवला
"आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥"
शब्द माणसाला मंत्रमुग्ध आणि अजरामर बनवतात. तुकाराम महाराज हेच त्यात सांगतात की, शब्द कसे शस्त्र बनतात ज्याने समाजाने पांगरलेला मळकट विचारांचा कपडा धारदार शब्दांच्या आधारे शस्त्र करून फाडता येईल ज्याने शब्दांची आणि विचारांची ताकद घडवून आणण्याचा प्रयत्न महाराज करतात.
मानसिक स्थिती आणि आपण:
आजकाल आपण खूप एकलकोंडे होत चाललो आहे. आपल्याला जे काही मांडायचे आहे ते आपण समाजमाध्यमावर मांडत असतो. पण त्यालाही मांडताना आपल्याला शब्दांची गरज पडते त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपण शब्दांच्या बाबतीत किती गरीब आहोत. आपण अलिकडे मध्येच अडखळतो "मला हे म्हणायचं होतं की? काय म्हणायचं होतं हे शब्द नसल्यामुळे सांगताच येत नाही" आपण संत साहित्यातल्या शब्दांचा आधार घेऊ शकतो पण तेव्हाच जेव्हा ते आपण वाचले असेल किंवा ऐकले असेल. जेव्हा संत साहित्याच्या विचारांची आणि शब्दांची ताकद आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपण म्हणू "होय मी माझ्या मुळातून काहीतरी शिकत आहे....."
Comments
Post a Comment